मिरज
दि. 17 सप्टेंबर रोजी भव्य प्रमाणात संपन्न होणार
दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती, समाधीसम्राट प.पू. 108 आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची 68 वी पुण्यतिथी महोत्सव मिरज जि. सांगली येथे दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे.
विसाव्या शतकातील प्रथमाचार्य,चारित्र्य चक्रवर्ती समाधिसम्राट प.पू. 108 प्रथमाचार्य श्री शांतिसागर महाराज यांचे पावन पवित्र्य, स्मृती चिंतन, अभिवादन करण्याबरोबरच त्यांना अभिप्रेत अशा चरित्र, चारित्र्य, संस्कार, अहिंसा, त्याग, तपस्या, संयम या सारख्या सदविचाराचे समाजात अभिसरण व्हावे, त्यांच्या आदेश उपदेशाचा प्रचार प्रसार व्हावा त्यांच्या अलौकिक चिरंजीव आचार विचाराचे,त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती समाजाच्या सर्व स्तरावर पोहचावी यासाठी या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन वीर सेवा दला कडून होत असते.
या पुण्यतिथी महोत्सवाचा मुख्य समारोह रविवार दि.17 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न होत असून या समारोहासाठी प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी, संस्थान मठ नांदणी व प.पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी, संस्थान मठ कोल्हापूर यांचे पावन सानिध्य लाभणार आहे. या मंगलदिनी त्यांच्या सल्लेखना समयी सकाळी 6.55 वाजता शांतिद्विप प्रज्वलन, विश्वशांति प्रार्थना, अंतिम आदेश उपदेशाचा स्वाध्याय होणार आहे. तसेच पुण्यतिथीनिमित्त सकाळी 10 वा. अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता,शांतिसद्भावना रॅलीचा शुभारंभ सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मंताडाराजा दयानिधी यांच्या हस्ते संपन्न होणार असून प्रमुख अतिथी म्हणून सांगली पोलिस अधिक्षक बसवराज तेली यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या रॅलीमध्ये वीर सेवा दलाचे हजारो स्वयंसेवक, कार्यकर्ते, शाखा-शाखा मधून आलेले पथनाट्ये, सामाजिक- राष्ट्रीय विषय व आशय असणारे संदेश देणारे देखावे, वाद्यपथक यांचा समावेश असणार आहे.
पुण्यतिथी महामहोत्सवाचा मुख्य समारंभ दुपारी 1.30 वा. शालेय प्रांगणात संपन्न होणार असून प्रमुख वक्ते म्हणुन प्रा. गणेश शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. या समारंभाचे अध्यक्ष द.भा.जैन सभेचे अध्यक्ष श्रावकरत्न रावसाहेब पाटील तसेच स्वागताध्यक्ष वीर सेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील असणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश भाऊ खाडे, खा.संजयकाका पाटील, मा.खा. राजू शेट्टी, आम.जयंतराव पाटील, आम.प्रकाश आवाडे, आम.विश्वजीत कदम, आम.राजेंद्र पाटील यड्रावकर, आम.सुमनताई आर.आर.पाटील, आम.सुधीर गाडगीळ, आम. अभय पाटील, मा.शरद पाटील, मा.अजितराव घोरपडे, मा. संजय पाटील, मा.जयश्रीताई पाटील, मा. विशाल पाटील, द.भा.जैन सभेचे पदाधिकारी मा.भालचंद्र पाटील, मा.रावसाहेब पाटील, मा. दत्ता उर्फ माधव डोर्ले, डॉ.अजित पाटील, मा.संजय शेटे, मा.अरविंद मजलेकर, मा.शशिकांत राजोबा, मा.सुरेश पाटील यांच्या व अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ संपन्न होणार आहे .
पुण्यतिथी महामहोत्सवानिमित्त मिरज येथे दि.10 सप्टेंबर रोजी आरोग्य शिबीर, दि. 12 सप्टेंबर रोजी शांतिकलश रथ प्रवर्तन शुभारंभ, दि. 13 ते 16 रोजी सप्टेंबर शांतिसागर, कर्मवीर व वीराचार्य यांचे प्रदर्शन, दि. 14 सप्टेंबर वृक्षारोपण, दि. 15 ते 17 सप्टेंबर कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे दि. 15 सप्टेंबर रोजी महाविद्यालीन वक्तृत्व स्पर्धा, दि. 16 सप्टेंबर पाठशाळा वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा संपन्न होणार आहेत.
हा पुण्यतिथी महामहोत्सव वीर सेवा दल मध्यवर्ती समिती, दिगंबर जैन समाज मिरज, यांच्या वतीने संपन्न होत असून या पुण्यतिथी महोत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन वीर सेवा दलाचे सेक्रेटरी अजितकुमार भंडे यांनी केले. याप्रसंगी व्हा. चेअरमन सुभाष मगदूम, जॉ.सेक्रेटरी अभय पाटील, मुख्य संघटक सुनिल पाटील,संयोजक अनंतसागर गोरवाडे, कार्याध्यक्ष सुरेशबापू आवटी, उपाध्यक्ष विवेक उर्फ बंडू शेटे, सुकुमार पाटील, सुभाष पाटील, अविनाश चौगुले तसेच समस्त दिगंबर जैन समाज, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ मिरज यांनी केले आहे.

Comments
Post a Comment